गेले अनेक महिने आपण यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाचे चारही पेपर व त्यांच्यातील उपघटक यांची सविस्तर चर्चा केली. पहिल्यापासूनच मुख्य परीक्षेचे स्वरूप हे लेखन कौशल्यावर भर देणारे राहिले आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर हे अधिक ठळकपणे समोर येते.
सामान्य अध्ययनाच्या घटकाची एकंदर मागणी ही, नुसती माहिती घोकणे व तिचे संकलन करून परीक्षेत लिहिणे अशी निश्चितच नाही. तर माहिती आणि संख्याशास्त्रीय विश्लेषण याचबरोबर मूलभूत संकल्पनांची स्पष्टता हा लिखाणाचा मूळ गाभा आहे. संकल्पनांच्या स्पष्टतेतूनच उत्तम प्रकारचे उत्तर तयार केले जाऊ शकते. चांगले उत्तर कसे लिहावे अथवा लिहू नये हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुळातच उत्तराची मागणी काय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जात
असताना काही ठरावीक शब्दप्रयोगांचा वापर होतो. त्यांचे अर्थ आणि त्यातील फरक लक्षात घेतल्यास आयोगाला अपेक्षित असलेले नेमके आणि मुद्देसूद उत्तर लिहिणे शक्य होते. उदाहरणादाखल खाली दिलेल्या, कायम विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि त्यातील बारकावे लक्षात घ्या.
Analyze
Ex- Several foreigners made India their homeland and participated in various movements. Analyze their role in the Indian struggle for freedom.
अनेक परदेशी व्यक्तींनी भारताला आपली मातृभूमी मानले व येथील सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण करा.
To Analyze म्हणजे विश्लेषण करणे. यात एखादा मुद्दा अत्यंत पद्धतशीरपणे अभ्यासणे, त्याचे सुयोग्य स्पष्टीकरण देणे आणि प्रश्नाच्या स्वरूपानुसार त्यातून अभिप्रेत असलेला अर्थ मांडणे. येथे विषयाच्या मूळ गाभ्यातील घटकांचे सुसंगत असे विभागीकरण करणे आणि प्रत्येक भागाबद्दल सखोल स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. उत्तरातील मुद्दय़ांची योग्य मांडणी आणि विभाजन आणि त्यातील आंतरसंबंध यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे.
Critically evaluate
Ex- Restructuring of Centrally sponsored schemes across the sectors for ameliorating the cause of vulnerable sections of population aims at providing flexibility to the States in better implementation. Critically evaluate. समाजातील वंचित घटकांच्या सुधारणेसाठी वाव देणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांचे फेरनियोजन केले जात आहे. याचा मुख्य हेतू राज्यांना अंमलबजावणीसाठी आवश्यक लवचीकता पुरवणे हा आहे. चिकित्सक मूल्यमापन करा.
Critical म्हणजे चिकित्सक, टीकात्मक विचार होय. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये संबंधित मुद्दय़ांची सखोल चिकित्सा करणे अपेक्षित आहे. ही चिकित्सा करताना, संबंधित मुद्दय़ांच्या मर्यादा, त्याचे दुष्परिणाम, उणिवा आणि भविष्यातील धोके व तोटे या सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.
Critically (explain/ assess/ examine/ evaluate/ discuss)) अशा स्वरूपाच्या प्रश्नांचे उत्तर लिहिताना, विद्यार्थ्यांनी संबंधित मुद्दय़ाचे तोटे आणि उणिवा यावर भर देणे अपेक्षित आहे. थोडक्यात, उत्तराच्या नकारात्मक आणि आव्हानात्मक बाजूंवर भर देणे अपेक्षित आहे.
मुख्य परीक्षेत कायम विचारल्या जाणाऱ्या अशा प्रश्नांचा सखोल अभ्यास करून, त्यांचे स्वरूप लक्षात घेऊन मगच लेखनाचा सराव करावा. प्रश्नासाठी अपेक्षित असलेले अचूक उत्तर हे विविध घटकांचे एकत्रीकरण असते. यामध्ये संकल्पनांची स्पष्टता, संख्याशास्त्रीय आणि इतर माहिती, दृष्टिकोन आणि प्रश्नाचे अचूक आकलन व त्या दिशेने मांडणी याचा अंतर्भाव होतो.
म्हणूनच उमेदवारांनी उत्तराच्या लेखनाचा सराव करत असताना वरील बाबी ध्यानात ठेवाव्यात. तसेच सामान्य अध्ययनाचे सर्व पेपर हे अर्थपूर्ण आणि कौशल्यपूर्ण लिखाणावर अवलंबून आहेत याचे कायम भान असणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment